

Liquor Factory Busted
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी धाडसी कारवाई करीत अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त गावातील जंगलात बनावट विषारी दारु निर्मितीचा कारखाना उदध्वस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील ४ जणांना अटक केली असून, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसंत प्रधान पावरा (२९, रा.बोराडी, ता. शिरपूर जि.धुळे), शिवदास अमरसिंग पावरा (३५, रा.धाबापाडा, ता.शिरपूर, जि.धुळे), अर्जुन तायाराम अहिरे (३३) रवींद्र नारायण पावरा (१८, रा.सलाईपाडा, ता.शिरपूर, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारुविक्रीविरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्त यांनी सी-६० पथकाचे जवान आणि अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील जवानांना सोबत घेत १४ मे च्या संध्याकाळी भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील जंगल गाठले.
पोलिसांना पाहताच घटनास्थळावरुन एक चारचाकी वाहन ताडगाव-आलापल्ली मार्गाने जाताना दिसले. पोलिसांनी पाठलाग करुन वाहन थांबविले. मात्र, चालक पळून गेला. या वाहनात देशी दारुच्या पेट्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढत दुसऱ्या दिवशी सकाळी बनावट दारु कारखान्याचा शोध लावला. तेव्हा घटनास्थळी १३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४५०० लीटर स्पीरिट, ८ लाख २५ हजार रुपये किमतीचे २ हजार ७५० लीटर बनावट देशी दारुने भरलेले ड्रम, ६ लाख ९६ हजार रुपये किमतीच्या ९० मिलीलीटर मापाच्या ८७०० बाटल्या, ४ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन, ६० हजार रुपयांची एक मोटारसायकल, १ लाख रुपये किमतीचे जनरेटर, २ लाख ५० हजार रुपये किमतीची बाटली सिलिंग करण्याची मशिन, तसेच २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे अन्य साहित्य असा एकूण ३९ लाख ३१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वसंत पावरा, शिवदास पावरा, अर्जुन अहिरे व रवींद्र पावरा यांच्यावर ताडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील उपनिरीक्षक विजय सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार सुधाकर दंडिकवार, अकबरशहा पोयाम, अंमलदार शिवप्रसाद करमे, राहू पंचफुलीवार, निकेश कोडापे यांनी सहभाग घेतला.