

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू-ब्राम्हणवाडी येथे गोवा बनावटीच्या तब्बल १७ लाख ९३ हजार ७६० रुपयांच्या दारूची दोन वाहनांमधून बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथक तसेच ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले.
दोन्ही वाहनांची किंमत समाविष्ट करून एकूण ८७ लाख ९३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४४ वा. सुमारास करण्यात आली.
विजय प्रभाकर तेली (वय ३२, रा. स्टेट बँक कॉलनी, कळंबट कणकवली, सिंधुदुर्ग) आणि अक्षय चंद्रशेखर गाडगावकर (२१, रा. रामगड देऊळवाडी, ता. मालवण, सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई),८०,८१८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील विजय तेली हा आपल्या ताब्यातील ५० लाख किमतीच्या टोयोटा फॉर्च्यूनर गाडी (एमएच ०१-बीसी-१६१६) मधून ९ लाख ७४ हजार ८८० रुपयांचा गोवा बनावटीचा दारु साठा तर अक्षय गाडीघावकर हा आपल्या ताब्यातील २० लाख किमतीच्या हुंडाई क्रेटा गाडी (एमएच-०७-एबी- १५७३) मधून ८ लाख १८ हजार ८८० रुपयांचा दारु साठ्याची बेकायदेशिरपणे वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील या करत आहेत.