

Devendra Fadnavis on Urban Naxalism
गडचिरोली : जंगलातील माओवादाचे उच्चाटन करण्यात शासन यशस्वी झाले असले; तरी शहरी माओवादाचे आव्हान उभे ठाकले आहे. परराज्यातील काही व्यक्ती सरकार अन्याय करीत असल्याच्या खोट्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असून, त्यासाठी त्यांना विदेशातून बक्कळ पैसा मिळत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि.२२) कोनसरी येथे लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सुरु केलेल्या ४.५ एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प, १०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय, सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली येथील कर्मचारी वसाहतीचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ पार पडला, यावेळी ते बोलत होते.
गडचिरोलीच्या जंगलातील माओवादाचे उच्चाटन करण्यात शासनाने यश मिळविले आहे. काही मोजके बंदुकधारी शिल्लक आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करुन संवैधानिक व्यवस्था स्वीकारावी. असे आवाहन फडणवीस यांनी केले. आता जंगलातील माओवादापेक्षा शहरी माओवाद वेगाने पसरताना दिसत आहे. काही डाव्या विचारसरणीचे लोक आदिवासींच्या जमिनी हडप करण्यात येत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित करीत आहेत. अशा बातम्या प्रसारित करणाऱ्या ४ जणांचा शोध पोलिसांनी लावला आहे. त्यातील दोघे बंगळुरु, तर अन्य दोघे कोलकाता येथील असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना विदेशातून फंडींग मिळत असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
गडचिरोलीत उद्योग येत असल्याने गोरगरीब युवक, युवतींना रोजगार मिळत आहे. काही आत्मसमर्पित नक्षल्यांनाही रोजगार मिळाला आहे. लोकांचे जीवनमान बदलत आहे. मात्र, जल, जंगल आणि जमीन अबाधित राखून विकास करण्याचे आमचे धोरण असून, भविष्यात गडचिरोली जिल्हा राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांना अतिडाव्या विचारसरणीने ग्रासले असल्याची टीका केली. जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी सुचविलेल्या विषयांचा विचार करण्यात आला आहे. मात्र, ते उगीचच बाऊ करीत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 'सरकार भिकारी आहे' या वक्तव्याबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं वक्तव्य चुकीचं व दुर्दैवी असल्याचं सांगितलं. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आम्ही वित्तीय तूट ३ टक्क्यांच्या आत ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. पीक विम्याच्या पद्धतीतही सुधारणा केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमानंतर गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात ४० लाख वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, पद्मश्री तुलसी मुंडा, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.