

Nambala Keshav Rao killed in Chhattisgarh Maoist Encounter
गडचिरोली: छत्तीसगड राज्यातील अबुडमाडच्या जंगलात आज (दि.२१) सकाळी तेथील डीआरजी पोलिस दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत देशातील नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता, पॉलिट ब्युरो सदस्य तथा माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसव राजू ठार झाला. अभियांत्रिकीची पदवी घेतलेला तरुण ते नक्षल्यांचा देशातील सर्वोच्च नेता असा नंबाला केशव राव याचा नक्षल चळवळीतील प्रवास थक्क करणारा आहे.
७० वर्षीय नंबाला केशव रावचा जन्म १९५५ मध्ये आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेठ गावात झाला. नंबालाने आंध्रपदेशातील वारंगळ येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी.टेकची पदवी संपादन केली आहे. १९७० पासून तो माओवादी चळवळीत सक्रिय होता. एम्बुश लावणे, जिलेटिनचा स्फोट घडवून आणणे या बाबींमध्ये तो पारंगत होता. त्याने गुर्रिल्ला वॉरचे लिट्टेकडून प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले जाते. १९९२ मध्ये नंबाला केशव राव हा त्यावेळच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) चा केंद्रीय समिती सदस्य म्हणून निवडून आला. २००४ मध्ये जेव्हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) हा पक्ष तयार झाला, तेव्हा नंबाला रावची नियुक्ती सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून करण्यात आली. माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने वाढते वय आणि आजारामुळे पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला, तेव्हा १० नोव्हेंबर २०१८ रोजी नंबाला केशव रावची महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. हे पद माओवादी चळवळीत सर्वोचच समजले जाते.
छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये पोलिस आणि मोठ्या राजकीय नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांचा मास्टर माईंड नंबाला केशव राव हाच होता. २०१० मध्ये दंतेवाडा मध्ये झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे ७६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर जीरम घाटी मध्ये झालेल्या हल्ल्यात काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा व नंदकुमार पटेल यांच्यासह २७ जण ठार झाले होते. २३ सप्टेंबर २०१८ मध्ये आंध्रपदेश मधील सत्तारुढ तेलगू देसम पक्षाचे आमदार किदरी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची ओडिशाच्या सीमेवर हत्या करण्यात आली होती. या घटनांमध्ये नंबाला केशव राव याचीच योजना असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मोस्ट वाँटेड फरार लोकांच्या यादीत नंबाला केशव राव याच्या नावाचा उल्लेख् आहे.
नंबाला केशव चकमकीत ठार झाल्यानंतर आता माओवाद्यांचा सर्वोच्च नेता कोण असेल, याविषयीची चर्चा सुरु झाली आहे. मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती, नंबाला केशव राव, कटकम सुदर्शन उर्फ आनंद, मलोजुल्ला उर्फ भूपती, मिशिर बेसरा व थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी हे सहा प्रमुख नेते माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आहेत. यातील थिप्पारी तिरुपती याच्यावर १ कोटी रुपयांचे, तर उर्वरित पाचही जणांवर दीड कोटी रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले आहे.
या सहा नक्षल नेत्यांपैकी गणपतीने आजारपणामुळे महासचिव पद आधीच सोडले आहे, तर नवा महासचिव नंबाला केशव चकमकीत ठार झाला आहे. कटकम सुदर्शन याचा ३१ मे २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मलोजुल्ला उर्फ भूपती, मिशिर बेसरा व थिपपारी तिरुपती या तिघांपैकी एकाकडे महासचिव पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. भूपती व थिप्पारी हे तेलंगणातील, तर मिशिर बेसरा हा झारखंडमधील नक्षल चळवळीत सक्रिय आहे.