

CPIM Agitation Land Allotment Controversy
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यात प्रस्तावित जिंदाल स्टील प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे भूसंपादन करण्याच्या विरोधात आज (दि.२) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेने संपूर्ण राज्यात स्थानिक मुद्यांवर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. याअंतर्गत माकपचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, ऋषी सहारे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात रोजगार आणि विकासाच्या नावाखाली बळजबरीने स्थानिकांच्या सुपीक जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सरकार करत असून, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी उद्योगांना न देता पर्यायी सरकारी व वनविभागाच्या जमिनी देण्यात याव्या, स्थानिक ग्रामसभांचा प्रखर विरोध असलेल्या कोरची तालुक्यातील झेंडेपार लोह प्रकल्प रद्द करण्यात यावा, काबीलकास्त शेती कसणाऱ्यांना पट्टे देण्यात यावे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करावा, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशावर्कर, शालेय स्वयंपाकी, रोजगार सेवक इत्यादी असंघटीत कामगारांना मासिक २६ हजार रूपये वेतन देण्यात यावे व त्यांना ५ हजार मासिक पेन्शन देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊन स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी करण्यात यावी, रानटी हत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ७५ हजार रूपये भरपाई द्यावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माकपचे तालुका सचिव कॉम्रेड राजू सातपुते, तालुका सहसचिव विठ्ठल प्रधान, तालुका प्रमुख देवचंद मेश्राम, नंदू बांडे, शेषराव वासेकर, प्रेमलाल बारसागडे, शामराव बारस्कर, देवराव तोरणकर, दिलीप कुकुडकर, विलास बारस्कर, हेमराज भोयर, रघुनाथ बारस्कर, देवराव उपरीकर, मोरेश्वर दुमाने, केवळ मेश्राम, गंगाधर मोटघरे, राजू भोयर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.