

Gadchiroli Dhanora Highway Incident
गडचिरोली : गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी गडचिरोली पंचायत समितीचे माजी सदस्य अमिता मडावी यांनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. हे काम सुरु असताना ६ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास कामाच्या स्थळाजवळून जात असताना मोटारसायकल स्लीप होऊन भगचंद माणिक लिलारे या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. महामार्गासाठी जेसीबीने खोदकाम सुरु होते. त्यामुळे रस्त्यावरची गिट्टी बाहेर अस्ताव्यस्त पसरली होती. परिणामी मोटारसायकल घसरुन दगडावर आदळल्याने भगचंद लिलारेचा खाली कोसळून मृत्यू झाला. यासाठी संबंधित कंत्राटदाराचा अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत आहे. महामार्गाचे काम सुरु असताना रहदारी बंद करणे आवश्यक आहे. परंतु कंत्राटदाराने नियमाचे पालन न करता दोन्ही बाजूंनी रहदारी सुरु ठेवली. शिवाय जेबीसीद्वारे खोदकामही करणे सुरु ठेवले. त्यामुळे हा अपघात झाला आणि भगचंद लिलारेचा मृत्यू झाला, असे अमिता मडावी यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
महिनाभरापासून धानोरा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील महिन्यात ट्रक चिखलात फसल्यामुळे गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बारा तास बंद होती. तसेच धानोरा शहरात लाकूड वाहतूक करणारा ट्रक उलटला. यात जीवित हानी टळली. मात्र, वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. १५ जून रोजी संजय ठाकूर या ४८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ठाकूर यांचा ट्रक महामार्गावर खोदकाम सुरु असल्याने चिखलात फसून नादुरुस्त झाला. यामुळे मानसिकदृ्ष्ट्या खचल्याने ठाकूर यांना प्राण गमवावा लागला. एकूणच दोन्ही मृत्यूंना महामार्गाचे काम करणारा कंत्राटदार जबाबदार असून, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमिता मडावी यांनी केली आहे.
माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनियमितता असल्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही निवेदन दिले आहे. राष्ट्रीय महामार्गाची रुंदी धानोरा शहरातून दोन्ही बाजूंनी कमी करण्यात आली आहे. रहदारीचा त्रास होऊ नये म्हणून, एकाच बाजूला खोदकाम करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने दोन्ही बाजूंनी रस्ता खोदला आहे. परिणामी वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून, ती जीवघेणी ठरत आहे. शिवाय महामार्गासाठी टेस्टींग केलेले मुरुम वापरणे अनिवार्य असताना ते न वापरता खोदकामातून निघालेली माती वापरण्यात येत आहे. शिवाय अन्य अनियमितताही आहेत. परंतु संबंधित अधिकाऱ्यांचा वचक नाही. त्यामुळे या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्याला निलंबित करावे, अशी मागणीही अमिता मडावी यांनी कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.