

Ahiri women and child hospital inauguration
गडचिरोली : अहेरी येथील ८३ कोटी रुपये किंमतीच्या शंभर खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून 'आदिशा' प्रकल्पांतर्गत स्वयंसाहाय्यता बचत गटांना साडेतीन कोटी आणि प्रत्येक महिला बचत गटाला एक लाख रुपयांचे फिरते भांडवल फडणवीसांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शिवाय कोठी आणि रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, वेंगणूर येथील उपकेंद्र आणि जारावंडी व ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकांच्या इमारतीं आणि चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, एटापल्ली येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. तत्पूर्वी सिरोंचा येथे ३५० बेडच्या ३५० बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच मेडिकल व नर्सिंग कॉलेजचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सुविधा पोहचली पाहिेजे यासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिराची संकल्पना मांडली. दक्षिण गडचिरोलीत आरोग्य व्यवस्था मजबूत झाल्यानं जिल्ह्याच्या आरोग्य् व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त् केला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल. गडचिरोलीला देशाचं स्टील हब बनवायचं असून, जल, जंगल आणि जमिनीचं संवर्धन करीत औद्योगिक विकास करावयाचा आहे, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी येथील उद्योगांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक भूमिपूत्रांना रोजगार दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. जिल्ह्यात रस्ते व पूल निर्मितीसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी राज्यात २५ लाख लखपती दिदी तयार केल्या. पुढे हा आकडा १ कोटीपर्यत वाढविण्यात येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
याप्रसंगी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे, पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम, माजी खासदार अशोक नेते उपस्थित होते.