

गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात आज छत्तीसगड पोलिसांनी मोठे अभियान राबवत माओवाद्यांच्या दोन केंद्रीय समिती सदस्यांना कंठस्नान घातले. कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ राजू उर्फ विकल्प (६३) आणि कादरी सत्यनारायण रेड्डी उर्प्फ कोसा उर्फ गोपन्ना उर्फ बुचन्ना(६७) अशी ठार झालेल्या नक्षल्यांची नावे आहेत. या दोघांवर छत्तीसगड सरकारने प्रत्येकी ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी मोठ्या नेत्यांसह एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी त्या परिसरात अभियान सुरु केले होते. आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पसार झाले. चकमकीनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता त्यात दोन नक्षली पुरुषांचे मृतदेह आढळून आले. संध्याकाळी त्यांची ओळख पटविण्यात आली. कट्टा रामचंद्र रेड्डी आणि कादरी सत्यनारायण रेड्डी उर्फ कोसा हे दोघेही माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समिती सदस्य असून ते तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील रहिवासी होते.
दोघेही मागील ३० वर्षांपासून दंडकारण्य विशेष क्षेत्रिय समितीमध्ये कार्यरत होते. अनेक हिंसक घटनांचे ते मास्टरमाईंड होते. कादरी सत्यनारायण रेड्डी हा अनेक वर्षे दंडकारण्य समितीचा प्रवक्ताही होता. मे महिन्यात छत्तीसगड पोलिसांनी माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता बसवा राजू यास ठार केल्यानंतर आणखी काही केंद्रीय समिती सदस्यांना कंठस्नान घातले. शिवाय सुजाता नामक केंद्रीय समिती सदस्य असलेल्या महिलेने अलीकडेच तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आज दोन केंद्रीय सदस्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याने नक्षल चळवळीला अखेरची घरघर लागल्याचे दिसून यचेत आहे.