

Gadchiroli Gondwana University
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात चालढकल करीत असल्याने आज (दि.११) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.
शैक्षणिक प्रवेशाची १५ ऑगस्ट ही शेवटची तारीख निश्चित करून त्यावर आधारित विद्यापीठाचे शैक्षणिक कॅलेंडर तयार करावे, तसेच ते तयार करताना सर्व घटकांचा विचार करावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व सोपी करावी, प्रवेशासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवावी, अनेक वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका तत्काळ घेण्यात याव्यात. इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. विविध अभ्यासक्रमांच्या शुल्काचे निकष निश्चित करणारे कायदे आणि नियम अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल अभाविपने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांना निवेदन देण्यात आले.
विदर्भ प्रांत मंत्री पायल किन्नाके, चंद्रपूर जिल्हा संघटनमंत्री सुजान चौधरी, गडचिरोली जिल्हा संयोजक विकास बोदलकर, चंद्रपूर जिल्हा संयोजक भूषण डफ, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक राजकुमार गेडाम, गडचिरोली नगर मंत्री संकेत म्हस्के, ब्रम्हपुरी नगरमंत्री कल्याणी मानगुळदे यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गोंडवाना विद्यापीठ स्थापनेपासूनच विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. पदभरती, साहित्य खरेदी व पदवीदान असे विविध कंगोरे या चर्चेचे केंद्रबिंदू होते. अलीकडेच नियम डावलून पीएचडीची मौखिक परीक्षा घेण्यात आल्याचा आरोप काही सिनेट सदस्यांनी केला. विशेष म्हणजे, विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य प्राधिकरणांवर शिक्षण मंच या संघटनेचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर, अभाविपने विद्यापीठावर काढलेल्या मोर्चाची चर्चा होत आहे.