

Vidarbha Diesel Shortage: विदर्भात खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे प्रचंड उष्णता, तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक भागांमध्ये चिंता वाढली आहे. गल्फ देशांमधील तणाव, युद्धाच्या शक्यता आणि इंधन पुरवठ्याबाबतच्या चर्चांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपांवर दिसू लागला आहे.
बुलढाणा, वाशिम आणि आसपासच्या ग्रामीण भागात अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ट्रॅक्टर, डिझेल कॅन आणि वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, एवढी प्रतीक्षा करूनही शेतकऱ्यांना पुरेसे डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
वाशिम जिल्ह्यातील धेपूड गावातील शेतकरी धनंजय गंगावणे यांची कहाणी या संकटाची तीव्रता दाखवणारी आहे. खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल आवश्यक आहे. मात्र, त्यांच्या परिसरात डिझेल उपलब्ध नसल्याने त्यांनी तब्बल 80 किलोमीटरचा प्रवास करून अकोल्यातील बार्शी टाकळी येथील पेट्रोल पंप गाठला.
पाच एकर शेती करणारे धनंजय सांगतात की, त्यांनी आधी 8 ते 10 पेट्रोल पंप फिरून पाहिले, पण कुठेही कॅनमध्ये डिझेल मिळाले नाही. शेवटी अकोल्यात 1000 रुपयांचे डिझेल मिळाले, पण त्यासाठी 200 रुपयांचा पेट्रोलचा खर्च करावा लागला. “जेवढं डिझेल मिळालं ते पुरेसं नाही, पण पेरणीपूर्व मशागतीसाठी तेवढंच समाधान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अशीच परिस्थिती वाशिममधील मालेगाव परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही आहे. अनेक जण डिझेलच्या शोधात जिल्ह्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.
विदर्भात सध्या तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू असतानाच आता डिझेलसाठीही लांबचा प्रवास करावा लागत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना मशागत आणि पेरणी वेळेत झाली नाही, तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे मात्र थोडे वेगळे आहे. त्यांच्या मते, प्रत्यक्षात डिझेलचा तुटवडा नसून भीतीमुळे अचानक वाढलेली मागणी ही मुख्य समस्या आहे. अकोला पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांच्या मते, गेल्या काही दिवसांत डिझेल आणि पेट्रोलच्या विक्रीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. “सरकारी सूचना, इंधन दरवाढ आणि संभाव्य संकटाच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त डिझेल घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते सांगतात.
त्यांच्या मते, खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी शेत तयार करण्याच्या घाईत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा इंधनाचा वापर अचानक वाढला असून, काही पंपांवर काही तासांतच स्टॉक संपत आहे.
अकोल्यातील काही पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “आमच्याकडे पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. बाहेरच्या जिल्ह्यांतून गर्दी वाढल्यामुळे दबाव आहे, पण कुणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही,” असे काही पंप चालकांचे म्हणणे आहे.
मात्र, शेतकऱ्यांची मागणी वेगळी आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतीसाठी स्वतंत्र डिझेल उपलब्ध करून द्यावे, ग्रामीण भागातील पुरवठा वाढवावा आणि कॅनमध्ये डिझेल देण्याचे नियम सुलभ करावेत, अशी मागणी होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जर ही परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही, तर त्याचा थेट परिणाम शेती आणि उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.