

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर चार ग्रामपंचायतीत भाजपला सत्ता मिळाली. आर्वी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत स्थानिक पॅनलच्या उमेदवार विजयी झाल्या. येथे भाजप, काँग्रेस दोन्हीकडून दावा केल्या जात होता.
जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात दोन आणि आर्वी तालुक्यात सात ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. वर्धा तालुक्यातील सालोड आणि बोरगाव (नां.) येथे भाजपची सत्ता आली. आर्वी तालुक्यात सातपैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आली. दोन ग्रामपंचायतीत भाजपला सत्ता मिळाली. आर्वी तालुक्यात भाजपचे आमदार दादाराव केचे, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
वर्धा तालुक्यातील सालोड (हि.) येथे अमोल कन्नाके, बोरगाव (नां.) येथे श्यामसुंदर खोत, आर्वी तालुक्यातील जाम येथे राजकुमार मनोरे, सर्कसपूर येथे गजानन हनवंते, अहिरवाडा येथे वीणा वलके, मांडला येथे सुरेंद्र धुर्वे, हैबतपूर येथे सचिन पाटील, नेरी येथे बाळा सोनटक्के, पिपरी येथील रज्जाक अली हे उमेदवार सरपंचपदासाठी विजयी झालेत.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विजयानंतर गुलाल लावत उमेदवार, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
भाजपचे आमदार भोयर यांचे दत्तक गाव सालोड येथे भाजपची सत्ता वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) हे गाव वर्ध्यातील भाजपचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांंचे दत्तक गाव म्हणून ओळखले जाते. सालोड येथे भाजप गटाकडून सरपंचपदासाठी अमोल कन्नाके मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेत.
सतरापैकी पंधरा जागांवर भाजप गटाचे उमेदवार विजयी झालेत. येथे भाजप गटाच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला. सालोडमध्ये सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. तसेच सदस्य पदासाठीही उमेदवार रिंगणात होते. आमदार डॉक्टर पंकज भोयर यांचे दत्तक गाव म्हणून ओळख असल्याने इथल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपचे वर्धा विधानसभा प्रमुख आशिष कुचेवार यांच्या नेतृत्त्वात येथील निवडणूक लढविण्यात आली.