सहा कोटी वर्षांपूर्वीच्या डायनोसोरचे जीवाश्म सापडले

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या डायनोसोरचे जीवाश्म सापडले

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : वणी तालुक्यातील वीरकुंड गावाजवळ सहा कोटी वर्षांपूर्वीच्या लेट क्रिटाशियस काळातील विशालकाय डायनोसोर या प्राण्याचे जीवाश्म सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी हा दावा केला आहे. मागील काही वर्षांपासून प्रा. चोपणे हे या परिसरात संशोधन करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी डायनोसोरच्या पायाचे एक अश्मीभूत हाड त्यांना सापडले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसोर जीवाश्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव व झरी तालुक्यात 6 कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिंपल्याची जीवाश्मे, तर 150 कोटी वर्षांपूर्वीची स्ट्रोमॅटोलाईटचे जीवाश्म शोधून काढले आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 25 हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीन अवजारेसुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तिगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी पाहण्यासाठी ठेवली आहेत.

वीरकुंड गावाजवळ 50 वर्षांपूर्वी डायनोसोरचा अश्मीभूत सांगाडा असावा; परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे बांधण्यासाठी वापरला. हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकर्‍यांनी डायनासोरची हाडेसुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. त्यामुळे येथे पुन्हा जीवाश्म आढळले नाही. 40 वर्षांपूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे याना एक जीवाश्मीकृत हाड सापडले. जीवाश्मांचा आकार, प्रकार, स्थळ, काळ आणि भूशास्त्र विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार हे जीवाश्म डायनासोरचेच आहे, असा विश्वास चोपणे यांनी व्यक्त केला. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खूप जीवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news