नागपूर : पुढारी वृत्तसेवा- नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर अभावी तरुणीचा मृत्यू झाला हाेता. या घटनेची मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी स्थापन केलेली चौकशी समिती मंगळवारी अहवाल सादर करणार असून, यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यवतमाळच्या वणी येथील वैष्णवी राजू बागेश्वर (वय १७) हिला बुधवारी मेडिकलमध्ये दाखल केले हाेते.वार्ड क्रमांक ४८ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. तिला व्हेंटिलेटरची गरज होती. पण, कुटुंबीयांना व्हेंटिलेटरच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. आई- वडिलांनी अॅम्बु बॅगव्दारे ऑक्सिजन देत तिला जवळपास ४० तास तिला जगविले; पण, या काळातही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देता आले नाही. अखेर शुक्रवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलच्या कारभारावर सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जाऊ लागला आहे.
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी शल्यचिकीत्सा विभागातील प्राध्यापक डॉ. ब्रिजेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, मेडिसीन विभागाचे प्रा. डॉ. मिलींद व्यवहारे, बधिरीकरण विभागातील प्राध्यापक डॉ. वासुदेव बारसागडे व मेट्रन वैशाली तायडे यांचा या समितीमध्ये समावेश आहे. सोमवारी समितीची पहिली बैठक होणार आहे. मंगळवारपर्यंत समितीला चौकशी अहवाल अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे सादर करायचा आहे. मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर असून यातील १९६ सुरु आहेत. तरीही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. त्यावेळी या सर्व व्हेंटिलेटरवर रुग्ण होते का, याची चौकशीही समितीतर्फे करण्यात येणार आहे.
हेही वाचा :