नागपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत.यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून प्रवासाला सुरुवात करतील. नागपूर ते शिर्डी असा ते प्रवास करतील.
उपमुख्यमंत्र्यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी
दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा तालुक्यातील वायफळ गावाजवळील कार्यक्रम स्थळाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. समृद्धी हा एकूण ७०१ किमीचा लांबीचा महामार्ग आहे.
हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण १२० मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.