

Zero Shadow Day Chandrapur
चंद्रपूर: आपली वर्षभर साथ करणारी सावली काही मिनिटांसाठी अचानक गायब झाली तर? हा अनुभव म्हणजेच ‘शून्य सावली दिवस’. खगोल अभ्यासक व चंद्रपूर स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत माहिती देत जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा दुर्मिळ खगोलीय क्षण प्रत्यक्ष अनुभवावा, असे आवाहन केले आहे.
चंद्रपूर शहरात २० मे रोजी दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे विशेष निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात सूर्य थेट डोक्यावर येत असल्याने काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होते. हा अनुभव विज्ञान आणि खगोलशास्त्राची उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.
पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी झुकलेला असल्याने सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान प्रवास दिसून येतो. सूर्याचा हा मार्ग कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांदरम्यान असल्यामुळे या पट्ट्यातील सर्व भागांवर सूर्य वर्षातून दोनदा अगदी डोक्यावर येतो.
यावेळी दुपारी उभ्या वस्तूंची सावली काही काळासाठी पूर्णपणे नाहीशी होते. यालाच ‘शून्य सावली दिवस’ म्हटले जाते. सूर्य दररोज सुमारे अर्धा अंश सरकत असल्याने एखाद्या अक्षवृत्तावर तो जवळपास दोन दिवस राहतो. त्यामुळे काही भागांमध्ये सलग दोन दिवस हा अनुभव घेता येतो.
खगोल अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात पुढीलप्रमाणे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत –
१८ मे – पाटण, विरूर, ढाबा, गांगपिंपरी
१९ मे – राजुरा, कोरपना, गडचांदूर, पोंभूर्णा, कोठारी, बल्लारपूर
२० मे – मूल, सावली, चंद्रपूर, घुग्घुस, भद्रावती, माजरी
२१ मे – वरोरा, सिंदेवाही, चंदनखेडा, शेगाव, मोहर्ली
२२ मे – चिमूर, नेरी, कोलारा
२३ मे – ब्रह्मपुरी, भिसी, नागभीड
प्रा. सुरेश चोपणे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना हा खगोलीय क्षण प्रत्यक्ष दाखविण्याचे आवाहन केले आहे. विज्ञान विषयातील जिज्ञासा वाढवण्यासाठी तसेच खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शून्य सावली दिवस हा केवळ वैज्ञानिक घटना नसून निसर्ग आणि खगोलशास्त्र समजून घेण्याची एक अनोखी संधी असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.