

Rajura Murder Case
चंद्रपूर : गावातील एका व्यक्तीसोबत पार्टी करीता रात्री घरून निघून गेलेल्या एका 33 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज (दि.२५ ) सकाळी उघडकीस आली आहे. नितेश किसन निमकर असे मृताचे नाव आहे. तो राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथील रहिवासी होता. या प्रकरणात राजुरा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मृत तरुणाचे वडिलांनी माझ्या मुलांची प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथील नितेश किसन निमकर हा रहिवासी होता. काल गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास तो घरी असताना त्याच्या मोबाईलवर गावातीलच एका व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर पत्नीला पार्टीला जात असल्याचे सांगून घरात निघाला. त्यावेळी वडिलानेही त्याची विचारपूस केली असता गावातील एका व्यक्तीसोबत पार्टी करण्याकरीता जात असल्याचे सांगून मोटारसायकलने तो निघून गेला. रात्री अकरा वाजले. परंतु तो घरी परत आला नाही. उशिरा येईल असे समजून घरातील सगळे कुटूंबिय झोपी गेले.
दुसऱ्या सकाळी आज शुक्रवारी सकाळी 6.00 वाजताचे सुमारास गावातील संतोष धानोरकर व्यक्तीने घरी येऊन गावापासून अर्धा किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला मुलगा पडून असल्याची माहिती दिली. लगेच वडील किसन निमकर काही लोकांना सोबत घेऊन पहण्यासाठी गेले. घटनास्थळी जावून पाहिले असतान मुलगा नितेश हा मृतावस्थेत पडून असल्याचे आढळून आले. अंगावर रक्त सांडलेले होते. डोक्याला गंभीर मारहाण केल्याचे आढळून आले. तंटामुक्ती समिती अध्यक्षाने लगेच राजूरा पोलिस ठाण्यात माहिती दिलली. राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह राजूरा येथे शवविच्छेदनाला पाठविला.
या प्रकरणात राजूरा पोलिसांनी तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. वडिलांनी प्रेम प्रकरणात मुलगा अडसर ठरत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी प्रेमप्रकरणाच्या दिशेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच पोलिस तपासात या हत्या प्रकरणाचे गुढ उकलण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मुलगा नितेश याचा मृतदेह आढळून आल्यानंतर राजुरा पोलिसांना लेखी तक्रार करून माझ्या मुलाची हत्या प्रेमप्रकरणातूच करण्यात आल्याचा गंभीर आरोप वडील किसन निमकर यांनी केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, काल रात्री माझा मुलगा नितेश याला गावातील एका व्यक्तीने मोबाईलवरून पार्टी करण्याकरीता बोलाविले होते. त्या नंतर तो पार्टी करण्याकरीता घरून निघून गेला. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर मारहाण आढळून आली आहे. ज्या व्यक्तीने पार्टी करण्यासाठी रात्री जेवायला बोलविले त्या व्यक्तीचे माझ्या मुलाच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सदर व्यक्तीचे घर लागून असल्याने तो घरी यायचा, सुनेसोबत नेहमीच बोलायचे. एकदा तर त्याने रात्री बारा वाजता आमच्या घरी आला. त्यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, परतु हाताला धक्का मारून तो पळून गेला. त्यामुळे दोघांच्या प्रेमात मुलगा अडसर ठरत असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप वडील किसन निमकर यांनी तक्रारीतून केला आहे.