Chandrapur Protest | चिखलमय रस्त्यावरच महिलांनी केली ‘रोवणी’; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अनोखा निषेध

व्याहाड खुर्दच्या किसान नगरातील ५०० मीटर रस्त्याची दुरवस्था; कायमस्वरूपी रस्ता बांधकामाची ग्रामस्थांची मागणी
Chandrapur  Women Paddy Planting Protest
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी चक्क चिखलमय रस्त्यावरच ‘रोवणी’ करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.Pudhari
Published on
Updated on

Chandrapur Women Paddy Planting Protest

चंद्रपूर : व्याहाड खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत किसान नगर परिसरातील जिल्हा परिषद शाळा ते सोमी गलगट या सुमारे ५०० मीटर रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चिखलवाट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांची ये-जा धोकादायक झाली असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी चक्क चिखलमय रस्त्यावरच ‘रोवणी’ करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

किसान नगर परिसरातील या रस्त्याची पावसाळ्यात दरवर्षी दुरवस्था होत असून, शाळकरी मुले, महिला, वृद्ध तसेच दुचाकीस्वारांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. चिखलामुळे घसरून अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

Chandrapur  Women Paddy Planting Protest
Chandrapur News | वरोरा पोलिस ठाण्यात ‘हरित रक्षक’ अभियानाला सुरुवात

या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांकडून संबंधित विभागाकडे अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे. मात्र, वारंवार निवेदने व मागण्या करूनही रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी चिखलमय रस्त्यावरच रोवणी करत निषेध व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात या रस्त्याच्या दुरवस्थेची चर्चा सुरू झाली आहे.

तातडीने पाहणीची मागणी

किसान नगरातील नागरिकांना वर्षानुवर्षे चिखलातून वाट काढण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करावा आणि सुमारे ५०० मीटर रस्त्याचे कायमस्वरूपी बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news