Chandrapur News
चंद्रपूर : मावशीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागभीड तालुक्यातील बामणी येथे घडली. निकेश बंडू कुमरे (वय ३५) असे मृताचे नाव असून, प्रमोद बंडू कुमरे (वय ३०) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. या घटनेमुळे बामणी परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकेश आणि प्रमोद हे दोघेही सख्खे भाऊ असून अविवाहित होते. निकेश हा आपली विधवा आई आणि विधवा मावशी यांच्यासोबत बामणी येथे एकाच घरात राहत होता. तर प्रमोद हा गावातील आपल्या मामाच्या घरी राहत होता.
मोठ्या भावाने मावशीला शिवीगाळ केल्याची माहिती प्रमोदला मिळाली. याच कारणावरून संतप्त झालेल्या प्रमोदने निकेश राहत असलेल्या घरी जाऊन त्याच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रमोदने काठीने निकेशच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निकेशचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची गावात चर्चा सुरू झाल्यानंतर आरोपी प्रमोदने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नागभीडचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.