

Chandrapur news:
चंद्रपूर : भाऊबीज सणानिमित्त माहेरी जाऊन परतणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना वरोरा बसस्थानक परिसरात घडली. या चोरीत ४३ हजार ७४० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याने महिलेचे नुकसान झाले आहे.
गिरजा बाबाराव खोके (वय ६०) रा. बोरी, ता. वरोरा या पती बाबाराव यांच्यासह भाऊबीज सणानिमित्त १५ नोव्हेंबर रोजी माहेरी करणवाडी (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथे गेल्या होत्या. १७ नोव्हेंबर रोजी माहेरून परतताना त्या वणी मार्गे दुपारी वरोरा बसस्थानकावर पोहोचल्या. वडकीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यापूर्वी त्यांनी पर्सची चैन व्यवस्थित लावली होती व मंगळसूत्र सुरक्षित असल्याची खात्री केली होती.
मात्र, बसमध्ये पतीसह आसनावर बसल्यानंतर पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्स तपासली असता त्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब असल्याचे आढळले. मंगळसूत्रात दोन डोरले, सहा कारले मणी आणि दोन ग्रॅम वजनाचे षटकोनी मणी असा एकूण नऊ ग्रॅम सोन्याचा समावेश होता. त्याची किंमत ४३ हजार ७४० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्समधून मंगळसूत्र चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेमुळे महिलेची प्रकृती बिघडली व रक्तदाब कमी झाल्याने त्यांनी तत्काळ तक्रार दिली नाही. प्रकृती सुधारल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी पतीसह वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.