

Sindewahi taluka leopard attack on Child
चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात काल गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास घराच्या उंबरठ्यावरूनच आठ वर्षांच्या चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेल्यानंतर तब्ब्ल 11 तासांनी त्यांचा मृतदेह गावाशेजारील हुडकीच्या जवळ आढळून आला आहे. प्रशिक बबन मानकर असे मृताचे नाव आहे. या घटनेने वनविभागाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने मृतदेह शवविच्छेदनास उचलण्यास कुटुंबीय व नागरिकांनी नकार दिल्याने अजूनही घराच्या अंगणात मृतदेह पडून आहे.
आधी गावातील नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षितेची खात्री द्या तरच मृतदेह उचला, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तणावपूर्ण स्थिती बघता दंगानियंत्रक पथकाला तैनात करण्यात आले असून दोनशे पोलिसाचा ताफा गावात दाखत करण्यात आला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव जंगल व टेकडीलगत वसलेले आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रस्थ आहे. काल गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास काका नंदू मानकर हा आठ वर्षाचा पुतण्या प्रशिक व सहा वर्षाच्या पुतणीला घेऊन गावात सार्वजनिक गणपतीचे जेवन करण्यासाठी गेला होता. जेवन आटोपून दोघांनाही साडेसातच्या सुमारास घरी घेऊन आला. त्याचवेळी अंगणाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधत काकाच्या डाव्या हातातूनच प्रशिकला बिबट्याने उचलून नेले. काकाने प्रचंड आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले, परंतु बिबट्याने क्षणात त्याला तोंडात घेऊन टेकडी परिसरात पळ काढला.
या घटनेची माहिती लगेच सिंदेवाही वनविभागाला देण्यात आली. दोन ते तिन अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या तोकड्या व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसही काही वेळात गावात पोहचले. त्यानंतर पोलिस आणि नागरिकांनी पूर्ण रात्रभर चिमुकल्याची शोधाशोध केली. काहीठिकाणी रक्ताचे डाग तर कुठे अंगारवरील कपड्याचे अवशेष आढळले. तब्ब्ल अकरा तासांनी हुडकी परिसरातील झुडपी जंगलात चिमुकल्या प्रशिकचा मृतदेह सकाळी साडेसहाच्या सुमारास आढळून आला. लगेच मृतदेह घरी आणण्यात आला.
मुलाचा मृतदेह पाहताच आई-वडील व आजीने केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. प्रशिक हा जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होता. कुटुंबात आई-वडील, आजी आणि सहा वर्षाची बहीण असा परिवार असून अचानक आलेल्या या संकटाने संपूर्ण मानकर कुटूंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. काही वेळानी पोलिस व वनविभागाने मृतदेह शवविच्छेदनाकरीता उचलण्याचा प्रयत्न केला परंतु कुटूंबिय व गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. वनविभागाच्या निष्क्रीय कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करीत गावत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. जो पर्यंत गावातील नागरिकांची वन्यप्राण्यांपासून सुरक्षितता होत नाही तो पर्यंत मृतदेह उचलता येणार नाही. अशी भूमिक घेऊन वनविभागच्या वरिष्ठांना गावात बोलविण्याची मागणी केली.
गावाच्या परिसरात गोंडकालीन किल्ला आहे. त्याच्या अवतीभवती हुडकी आहे. झुडपी जंगल असल्यामुळे याच परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट वाघांचे प्रस्थ आहे. त्याचा बंदोबस्त करा, हुडकी किल्याचा परिसर स्वच्छ करा, गावाला तारेचे कुंपन करा, बिबट,वाघांना पकडून दुसरीकडे हलवा त्यानंतर मृतदेह उचलला जाईल अशी भूमिका घेतली. त्यामुळे अजुनही सुमारे सात ते आठ तासापासून मृतदेह घरीच आहे. अद्यापही तोडगा निघालेला नाही. गावात तणावपूर्ण वातावरण बघता दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सुमारे दोनशे पोलिसांचा ताफा गावात तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या घटनेनंतर आज सकाळी बिबट्याने पुन्हा गावाच्या चौकात हजेरी लावली. त्यामुळे गावकरी व चिमुकले भयभित झाले आहेत. गावात तणावपूर्ण स्थिती आहे.
गावाच्या सभोवताल फेंसिंग उभारले जाईल. परिसरातील झाडीझुडपे काढून टाकण्यात येतील. दोन पिंजरे लावण्यात आले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र गस्त वाढविण्यात येणार आहे.
- अंजली बोरावार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही