

Mul Somnath tigress trapped
चंद्रपूर : मुल वनपरिक्षेत्रातील मारोडा उपक्षेत्रांतर्गत सोमनाथ प्रकल्प परिसरात एका महिलेचा बळी घेणारी वाघीण (टी २२६) अखेर वन विभागाच्या पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात आली. बुधवारी रात्री सुमारे ७ वाजताच्या सुमारास वनविभागाने ही कारवाई केली.
मुल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये नेहमी प्रमाणे अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने ही महिला पहाटेच्या सुमारास रात्रीचे भांडे घासण्याच्या उदेश्याने घराच्या मागील बाजूस निघाली. मागील भाग जंगलाला लागून असल्याने या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्या महिलेवर अचानक हल्ला चढविला. त्यानंतर तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. पत्नीने प्रचंड आरडाओरड केल्याने पती तुळशीराम जागा झाला आणि मदतीसाठी धावून आला. पतीने पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी तिचे पाय धरून सोडविण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग सुरू असतानाच नागरिक धावून आल्याने वाघाने अन्नपूर्णाला आपल्या तावडीतून सोडून जंगलाच्या या दिशेने पळ काढला. तो पर्यंत पत्नीला मृत्यू झाला होता.
नागरिकांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याचा मागणी केल्यानंतर वनविभागाने पकडण्यासाठी तयारी केली होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) चंद्रपूर-मूल वनपरिक्षेत्र उपक्षेत्र मारोडा नियतक्षेत्र-२ मधील सोमनाथ प्रकल्पातील शेत सर्वे क्र. २ मध्ये सापळा लावून वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वाघीणीला पकडले. मादी वाघीणीचा पंचनामा करून तिला प्राथमिक उपचार केंद्र, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. वाघीण टी २२६ एफ एस१ एफ सबऑडीट या नावाने नोंदवलेली असून तिची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे.
या मोहिमेत सहायक वनसंरक्षक स. यु. वाठोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे, अजय मराठे (पोलिस कॉन्स्टेबल), क्षेत्र सहायक व वनरक्षक यांची मोठी टीम कार्यरत होती. तसेच एसपीटीएफ मुल पथकाने देखील सक्रीय होते. मादी वाघीण टी २२६ ला जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेव नि:श्वास घेतला आहे. या कारवाईमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.