

Farmer killed Moharli forest
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानवी-वन्यजीव संघर्षाचा आणखी एक बळी गेला आहे. भद्रावती तालुक्यातील भामडेळी येथील शेतकरी अमोल बबन नन्नावरे (वय 38) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ बिटात घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज बुधवारी अमोल नन्नावरे हे आपल्या शेतामध्ये काम करण्याकरता सकाळी शेतात गेले. त्यानंतर शेतामध्ये काम करीत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. हल्ला एवढा भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने पोलीस व वन विभागाला कळवले.
सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे (मोहर्ली प्रादेशिक), भद्रावती पोलीस निरीक्षक योगेश पारधी, वनपाल तसेच क्षेत्रीय वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस पंचनामा व मौका पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे शवविच्छेदनासाठी हलवला.
वन विभागाने मृतकाच्या पत्नी सौ. प्रेमिला अमोल नन्नावरे यांना घटनास्थळीच रु. 50,000 इतकी तातडीची मदत दिली. उर्वरित भरपाईची प्रक्रिया नियमांनुसार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वाघाचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी लोक धजावत नाहीत. त्यामुळे वन विभागाने तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच शेतकरी व गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आणि एकटे शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा हा वाघसंख्येसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र वाढत्या मानवी वस्ती, शेतकरी कामकाज आणि जंगलाच्या सीमावर्ती भागातील मानवी हालचालीमुळे मानवी-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील काही महिन्यांत जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे.