

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धारणी तालुक्यातील हिराबंबई परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी २८ जानेवारी रोजी सुसर्दा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११७३ मध्ये घडली. सिताराम बन्सीलाल गुथारीया (वय ४०, रा. हिराबंबई) असे मृत तरुणाचे नाव असून, आपल्या दोन लहान मुलांच्या डोळ्यादेखत वडिलांवर वाघाने झडप घातल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम गुथारीया यांचा बैल गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी ते बुधवारी सकाळी आपली दोन मुले उमेश (वय १३) आणि महेश (वय १२) यांना सोबत घेऊन जंगलात गेले होते. हिराबंबई वन खंड क्रमांक ११७३ मध्ये बैलाचा शोध घेत असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सिताराम यांच्यावर झडप घातली. वाघ त्यांना जबड्यात पकडून दाट झाडीत ओढून घेऊन गेला. हा थरार प्रत्यक्ष पाहिल्याने दोन्ही मुले प्रचंड हादरून गेली. त्यांनी आरडाओरड करत गावाकडे धाव घेतली आणि कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल, कृषी समिती सभापती रोहित पटेल, सामाजिक कार्यकर्ते वहीद खान यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी अंजना बनसोड, ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, पीएसआय सतीश झाल्टे आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे हिराबंबई गावात दहशतीचे वातावरण असून गावकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिसरात वाघांचे हल्ले वारंवार होत असूनही वनविभाग ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.