चंद्रपूर : देशभरामध्ये तसेच राज्यभरात मुलांचे होत असलेले लैंगिक शोषण या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले. बाल संरक्षण कक्षाद्वारे बी.जे.एम.कारमल अकॅडमी, चंद्रपूर येथे लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण कायदा तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना जॉन्सन म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती व्हावी, यासाठी महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालय स्तरावर विशेष मेळाव्यांचे आयोजन करुन शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांना मेळाव्यात सहभागी करून घ्यावे. लोकांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचल्यास मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी होईल. पूर्वी विद्यार्थी मैदानात असायचे. आता मात्र, मोबाईलवर वेळ वाया घालतात, त्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे पालकांनीही मुलांप्रती जागृत असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म म्हणाल्या, जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध कायद्यांबाबत जनजागृती करण्यात आली आहे. बालकासोबत लैंगिक शोषणासारखा अनुचित प्रकार घडल्यास त्याच्या सवयीमध्ये बदल होतो. या सवयीची शिक्षकांनी नोंद घेऊन पालकांना माहिती द्यावी. पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद आवश्यक असून शिक्षकांचाही विद्यार्थ्यांशी संवाद तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक पालकांनी मुलांच्या बाबतीत जागृत असणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे टाळता येऊ शकतात.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, पोलीस निरीक्षक प्रभा एकूरके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, शिक्षणाधिकारी (माध्य.) अश्विनी सोनवणे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. मनीषा नखाते, रुदय संस्थेचे काशिनाथ देवगडे तसेच सायबर सेलचे मुजावर अली आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले. संचालन प्रिया पिंपळशेंडे तर आभार बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर यांनी मानले.