

चंद्रपूर : वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने भुईसपाट झालेल्या उन्हाळी धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नागभिडचे तहसीलदार प्रतापराव वाघमारे यांनी काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील 138 गावांतील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे.
सोमवारी (दि.5) तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा) परिसरातील, उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, सावरला, वाढोणा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन नुकसानीची तहसीलदारांना आपबिती सांगितली होती. त्यानंतर कालच सायंकाळी तहसीलदारांनी कारवाई करून पंचनामे करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
1 मे गुरूवारी रात्री आठच्या सुमरास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीने नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, किटाळी बोर, मांगरूड, तळोधी (बा.) परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला,लखमापूर, खरकाडा,आलेवाही शेतशिवारात झालेल्या गारपिटीच्या तडाख्याने उभे धानपिक उदध्वस्त झाले.
आकस्मिक संकटामुळे नुकसानीला सामोरे गेलेल्या शेकडों शेतकऱ्यांनी काल सोमवारी नागभीड तहसील कार्यालयावर धडक दिली. नागभिडचे तहसीलदार प्रतापराव वाघमारे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची आपबिती तहसीलदारांसमोर कथन केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची नुकसानीची व्यथा समजून घेतली. सायंकाळी गारपिटीने झालेल्या नुकसानीची भिषणता लक्षात घेता तहसीलदार यांनी नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे.