

Talodhi Upper Tehsil Office
चंद्रपूर : शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने १० ऑगस्ट २०१७ रोजी तळोधी (बा.) येथे अपर तहसील कार्यालयाची स्थापना केली. मात्र, स्थापनेनंतर जवळपास नऊ वर्षे उलटूनही या कार्यालयातील सहा पदे रिक्त असल्याने महसूल प्रशासनाचा कारभार मनुष्यबळाअभावी विस्कळीत झाला आहे. परिणामी, ८३ गावांतील नागरिकांना आजही विविध शासकीय कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
शासनाच्या निर्णयानुसार तळोधी (बा.) महसूल मंडळातील ४२ आणि मिंडाळा महसूल मंडळातील ४१ अशा एकूण ८३ गावांचा महसुली कारभार या कार्यालयाकडे सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्राची जबाबदारी असतानाही मंजूर पदांपैकी सहा पदे अद्याप रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
तळोधी (बा.) हे नागभीड तालुक्यातील महत्त्वाचे आर्थिक, शैक्षणिक, व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र आहे. येथे बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था, विविध शासकीय कार्यालये, महाविद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, कृषी विद्यालय, सीबीएसई शाळा तसेच अनेक सार्वजनिक संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येथे येतात. अशा परिस्थितीत अपर तहसील कार्यालयावरील कामाचा भार मोठ्या प्रमाणात वाढला असून कर्मचारी अपुरे असल्याने सेवा वितरणाचा वेग मंदावला आहे.
उत्पन्न, जात, निवासी दाखले, वारस नोंदी, फेरफार, जमीन अभिलेख तसेच विविध महसुली प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. स्थानिक स्तरावर कामे वेळेत न झाल्याने अनेकांना नागभीड तहसील कार्यालय गाठावे लागते. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे.
शासनाने 'सेवा आपल्या दारी' ही संकल्पना राबविण्याचा संकल्प केला असला, तरी तळोधी (बा.) अपर तहसील कार्यालयातील रिक्त पदांमुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या येत असून त्याचा कार्यालयीन कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.
तळोधी (बा.) हे केवळ एक गाव नसून ८३ गावांतील नागरिकांच्या प्रशासकीय गरजांचे केंद्र आहे. त्यामुळे रिक्त असलेली सहा पदे तातडीने भरून कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करावे, स्थानिक स्तरावर जलद, पारदर्शक आणि दर्जेदार महसूल सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सध्या प्रश्न केवळ सहा रिक्त पदांचा नसून ८३ गावांतील नागरिकांच्या विश्वासाचा आणि शासनाच्या 'सेवा आपल्या दारी' या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून तळोधी (बा.) अपर तहसील कार्यालय सक्षम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.