Chandrapur News : गोसेखुर्दचे पाणी उद्या सकाळी १० वाजता कालव्यात सोडणार, वडेट्टीवारांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन नमले

ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, सावली परिसरातील हजारो शेतकऱ्यांना  दिलासा
कोरडा पडलेला गोसीखूर्द कालवा
कोरडा पडलेला गोसीखूर्द कालवाFile photo
Published on
Updated on

चंद्रपूर :  गोसेखुर्द धरणातून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडावे, अन्यथा दोन दिवसांत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत अखेर गोसेखुर्द धरणातून उद्या १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, सावलीसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि कालव्याला वेळेत पाणी न मिळाल्याने धानासह विविध खरीप पिके करपण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम देत दोन दिवसांत पाणी न सोडल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. तसेच शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता.

या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत सिंचनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि अखेर गोसेखुर्द धरणातून उद्या १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून हजारो हेक्टर शेतीला जीवनदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, "हा विजय माझा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याचा आहे. प्रशासनाने योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे हजारो हेक्टर शेतीला दिलासा मिळणार आहे. मात्र भविष्यात अशा प्रश्नांवर शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी." यावेळी त्यांनी गोसेखुर्द कालव्याची प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचीही मागणी केली. शेती हंगामात शेतकऱ्यांना मुबलक व नियमित सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोसेखुर्दचे पाणी नियोजित वेळेत सोडण्याचा निर्णय झाल्याने ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, सावली आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याअभावी संकटात सापडलेल्या धान उत्पादकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. मतदारसंघातील प्रश्न असोत किंवा राज्यातील जनसामान्यांचे प्रश्न, न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समर्पित भावनेने काम केले पाहिजे. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे मतही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news