Tadoba Tiger Reserve | सफारी बुकिंगवरून ताडोबात वाद! आमदार भांगडीयांच्या ‘पीए’ने धमकी दिल्याचा वन अधिकाऱ्याचा आरोप

विभागीय वन अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलून फोनवर धमकी, वनविभागात मोठी खळबळ
Tadoba-Andhari Tiger Reserve
Tadoba-Andhari Tiger Reserve
Published on
Updated on

चंद्रपूर :   ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगवरून भाजप आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या स्वीय सहायकाने (पीए) विभागीय वन अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलून फोनवर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ताडोबा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी याबाबत क्षेत्र संचालकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे सफारी बुकींगवरून ताडोबात वाद निर्माण झालेला आहे.

शिंदे यांच्या लेखी तक्रारीनुसार, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक महेश प्रेमलवार यांनी ७ मे रोजी व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगसाठी ताडोबा पर्यटन माहिती केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर प्रेमलवार यांनी संबंधित महिला कर्मचारी तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांना फोनवर आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सचिन शिंदे यांनी या प्रकारामुळे आपल्या नैतिक धैर्यावर परिणाम झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून महेश प्रेमलवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत शिंदे यांनी “महेश प्रेमलवार यांच्यापासून जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वाटते,” असे नमूद केले असून संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंगही वरिष्ठांकडे सुपूर्द केली आहे. तसेच आमदार बंटी भांगडिया यांनाही त्यांच्या स्वीय सहायकाच्या वर्तनाची माहिती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

‘व्यवस्थापन कोटा’ ठरत आहे डोकेदुखी?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी असून सफारी बुकिंग हाऊसफुल आहे. मंत्री, खासदार, आमदार आणि अतिविशिष्ट व्यक्तींसाठी राखीव असलेला ‘व्यवस्थापन कोटा’ सध्या वन अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. या कोट्याच्या माध्यमातून वाढता राजकीय दबाव, धमक्या आणि शिफारशींचा ताण सहन करावा लागत असल्याने संबंधित जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी केली आहे.

ताडोबा प्रशासनाने घेतली दखल

विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांची तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणाची दखल ताडोबा प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाकडे माझे लक्ष आहे.

: प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प,चंद्रपूर.

माझ्यावर लावलेले आरोप पुर्णपणे खोटे : महेश प्रेमलवार, स्विय सहाय्यक (आ. भांगडीया)

वनअधिकारी शिंदे यांचेकडे आमदार भांगडीया यांचे सुचनेनुसार व्यवस्थापन कोट्यातून सफारी बुकींगसाठी शिफारशीचे पत्र पाठविण्यात आले. मात्र शिंदे यांनी त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने मला फोन करून तुम्ही साहेबांना प्रत्यक्ष भेटा असे सांगितले. या भेटीचा उद्देश मला कळला नाही.  मुळात शिंदे यांनी अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिउत्तर दिले नाही. आमदारांनी सांगितलेले काम करणे हे माझे कर्तव्य आहे तर लोकप्रतिनीधींना प्रतिउत्तर देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. माझ्यावर लावलेले आरोप पुर्णपणे खोटे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news