

चंद्रपूर : देशात प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील सुमारे आठ वाघांना सह्याद्री वाघ्र प्रकल्पात विसावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. वाघांना स्थलांतरीत करण्याच्या निर्णयानंतर दोन्ही व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन कोणत्या प्रकल्पातून किती वाघ स्थलांतरीत केले जातील याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी पुढारीशी बोलताना दिली.
राज्यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाव्यतिरिक्त अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार या ठिकाणी एकही वाघ नसल्याचे नमुद आहे. त्यामुळे सह्याद्रीमध्ये वाघांचा वावर राहावा याकरीता येथील व्यवस्थापनाने हालचाली सुरू केल्या होत्या. याकरीता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने राज्यातील ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सह्या्रदी मध्ये स्थलांतरीत करण्याकरीता प्रस्ताव सादर केला होता.
सुमारे दीड ते दोन वर्षांपासून या बाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाकडे काही त्रुट्यांमुळे प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावावर गुरूवारी केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने निर्णय घेऊन आठ वाघांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी गोड बातमी समोर आली आहे. डिसेंबर अखेर 3 नर व 5 मादी असे एकूण 8 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हलविण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने घेललेला निर्णय महासंचालक (वन्यजीव) डॉ. सुरभी राय यांनी, राज्याचे प्रधान मुख्य वनसरंक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांना या बाबत एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. सदर पत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील एकूण 8 वाघांना हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, परंतु दोन्ही प्रकल्पापैकी ताडोबा अंधारी व पेंच येथील किती वाघांना हलविण्यात येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
केंद्रीय पर्यावरणाने काही नियमांच्या आधारे वाघांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये वाघांना वनखात्याच्या देखरेखेखालीच जेरबंद व स्थलांतरीत करावे लागणार आहे. वाघांना जेरबंद व स्थलांतरीत करताना सर्व टप्यावर पुरेशी पशुवैद्यकिय व्यवस्था ठेवावी लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान वाघांना जेरबंद करताना काळजी घ्यावी लागेल, मुख्य वन्यजीव संरक्षकांना या प्रक्रियेचा संपूर्ण अहवाल सादर करावा लागेल, वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी किंवा धोक्यात आणणारी कोणतीही चुक घडल्यास मंत्रालयाने दिलेल्या परवानगीचा आढावा घेण्यात येईल किंवा ते रद्द करण्यात येईल असे नियम घालून दिले आहेत. याच नियमाच्या आधारे ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सह्याद्रीची वाट मोकळी झाली आहे. ह्या निर्णयानंतर सह्या्द्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक मिलिंद म्हैसकर यांनी, या निर्णयाचे स्वागत केले आहे. बऱ्याच काळपासून स्थलांतरणाची प्रतिक्षा होती. ती या निर्णयाने पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थलांतरणाची प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वनविभाग खबरदारी घेईल असे त्यांनी म्हटले आहे.
बऱ्याच वर्षांपासून यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होती. अखेर गुरूवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या ताडोबा व पेंच दोन्ही मिळून आठ वाघांना स्थलांतरीत करण्यावर निर्णय झाला आहे. परंतु कोणत्या प्रकल्पातील किती वाघ स्थलांतरीत होतील यावर निर्णय व्हायचा आहे. केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाच्या निर्णयानंतर यावर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये ताडोबामधून किती व पेंच मधून किती वाघ स्थलांतरीत होतील याचा निर्णय होईल, परंतू वाघांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
प्रभुनाथ शुक्ला, प्रकल्प संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर