

Tadoba Andhari tiger reserve Chhota Matka Tiger injured
चंद्रपूर : बुध्द पौर्णिमेच्या रात्री ब्रम्हा (T-158) वाघाचा खात्मा करून स्वत: गंभीर जखमी झालेला ताडोबा किंग छोटा मटक (T-126) ची ताडोबा वारी लांबणीवर गेली आहे. चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) केंद्रात पशुवैद्यकांची एक विशेष टीम त्याच्यावर उपचार करीत असून सध्यातरी छोटा मटकाला ताडोबा जंगलात सोडण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने दिली आहे.
बुध्द पौर्णिमेच्या रात्री ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी, बफर परिक्षेत्रा अंतर्गत निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्र.63 मधील उमरीखोरा परिक्षेत्रात छोटा मटका (T-126) व ब्रम्हा (T-158) या दोन वाघामध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या झुंजीत बह्मा वाघाला ठार करून छोटा मटका गंभीर जखमी झाला. त्याच्या तोंडाला व पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालता येत नव्हते. तेव्हा पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने छोटा मटकावर नैसर्गिक उपचार सुरू केले होते, परंतु प्रकृतीत फरक पडलेला नव्हता.
पर्यावरण तथा वन्यजीव प्रेमींनी ताडोबा किंग छोटा मटकाचे जीव वाचविण्यासाठी गंभीर चिंता व्यक्त करीत अनेकदा त्याच्या हालचालीचे जंगलातील व्हिडीओ शेअर केले. सोशल मीडिया, माध्यमांतून याबाबत बातम्या आल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. न्यायमुर्ती अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्या समक्ष सुनावणी नंतर या प्रकरणाचे कामकाज पहाण्यासाठी ॲड यश सांबरे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर जखमी छोटा मटकाला २७ ऑगस्टरोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) अंतर्गत खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मधून रेस्क्यू करून यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) केंद्रात आणण्यात आले. या ठिकाणी पशुवैद्यकांच्या तज्ज्ञ टीमकडून त्याची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या तपासणीत पॅथॉलॉजिकल, हिस्टॉलॉजिकल आणि रेडिओलॉजिकल तपासण्या करण्यात आल्या. शरीरावर कोणताही संसर्ग, पू, अळ्या किंवा फोड नाही, एक्स-रे अहवालात डाव्या पुढच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर आढळून आला. तसेच वाघाच्या सुळ्यांनाही नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, छोटा मटका ला तत्काळ जंगलात सोडणे शक्य नाही. त्याच्या हाडाच्या फ्रॅक्चरला आणि दातांच्या जखमेवर उपचार करण्यासाठी दीर्घकालीन वैद्यकीय देखभाल आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याची माहिती ताडोबा व्याघ्र व्यवस्थापनाने दिली आहे.
सध्या स्थिती पशुवैद्यकांची एक विशेष टीम वाघावर लक्ष ठेवून आहे. त्याच्या आहार, औषधोपचार आणि हालचालींवर नियमित नोंदी घेतल्या जात आहेत. छोटा मटका (T-126) च्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. ठणठणीत झाल्यानंतरच त्याला ताडोबा जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांनी दिली आहे.