

चंद्रपूर : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील "नयनतारा" वाघिणीच्या कार्याची दखल इटलीने घेतली आहे. ताडोबातील एका नाल्यातील पाण्यात पडून असलेल्या प्लॉस्टीक बॉटलला तोंडाने बाहेर काढून नयनताराने पर्यावरणपूरक संदेश दिला. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओची जगभरात प्रशंसा झाली. या पर्यावरणपूरक कार्यासाठी "नयनतारा" वाघिणीला इटलीने गोल्डन लिफ पुरस्काराने गौरविले आहे.
इटलीतील कॅम्पिडोग्लिओच्या प्रोमोटेका हॉलमध्ये ३० जुलैला 'इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हल' चा पुरस्कार सोहळा पार पडला. लघुपटाच्या माध्यमातून पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीप काठीकर यांच्या २३ सेकंदाच्या ‘नयनतारा वाघिणी’च्या लघुपटाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशातच नव्हे तर जगभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द स्थळ आहे. त्यामुळे देश विदेशी पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. काही महिन्यांपूर्वी या व्याघ्र प्रकल्पाच्या निमढेला बफर क्षेत्रात जांभूळडोह परिसरातील सिमेंट बंधारा परिसरातील नाल्यावर ‘नयनतारा’ ही वाघिण पाणी पिण्यासाठी गेली. परंतु पाणी न पिता ती सर्वप्रथम पाण्यावर तरंगणारी प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढून घेऊन गेली.
हा दूर्मिळ २३ सेकंदाचा प्रसंग वन्यजीव प्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी कैद केला. त्यानतंर नयनतारा या वाघिणीच्या पर्यावरणपूरक शौर्याचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या व्हिडीओ प्रचंड पसंती दिली. देशातच नव्हे तर विदेशातही या व्हिडीओची प्रशंसा झाली. वारंवार मानवाला पर्यावरणपूरक वातावरणाचे धडे मिळूनही व्याघ्र प्रकल्पासारख्या ठिकाणी प्लॉस्टिक बॉटलचा सर्रास वापर मानवाकडून होत असल्याचे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आले. तर वातावरण पर्यावरणपूरक करण्यासाठी मानवच नव्हे तर वन्यप्राणीही कार्य करीत असल्याचा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वदूर पोहचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या भावनिक व्हिडीओवर भाष्य केले होते. त्याच व्हिडीओची दखल आता इटलीमध्ये घेण्यात आली आहे. ३० जुलैला इटलीतील कॅम्पिडोग्लिओच्या प्रोमोटेका हॉलमध्ये इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार सोहळा पार पडला. पर्यावरण आणि निसर्गाशी निगडित हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड अशा विविध विषयांवर आयोजित लघुपटांना यात पुरस्कार देण्यात आले. प्रामुख्याने लघुपटाच्या माध्यमातून पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात दीप काठीकर यांच्या २३ सेकंदाच्या ‘नयनतारा वाघिणी’च्या लघुपटाला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दीप काठीकर यांच्यावतीने इटलीतील भारतीय दुतावासातील आयचा सालेम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.