

Chandrapur Municipal BJP vs Congress
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसला बेताल वक्तव्य करण्याचा संसर्गजन्य आजार झाला आहे,” अशी टीका करत मुनगंटीवार यांनी महापौरपदासाठी पैशांची भाषा करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
भाजपकडून उबाठा सदस्यांना एकेक कोटी रुपये देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. “एक ओबीसी बहीण महापौर होणार आहे. ती एवढे पैसे देऊ शकते का? पक्ष देऊ शकतो का? कोण कशासाठी पैसे देईल?” असा सवाल उपस्थित करत मुनगंटीवार यांनी वडेट्टीवारांचे आरोप निराधार असल्याचे सांगितले.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महापौर पदाच्या निवडीत पैशांची भाषा करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी हीच त्यांच्या अपयशाचे कारण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसमधील गट स्थापनेच्या घडामोडींवर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले, “काँग्रेसने एकदा गट स्थापन केला की त्यानंतर दुसरा गट स्थापन होऊ शकत नाही. पहिल्या गटातच इतर सदस्यांना सहभागी व्हावे लागते.” याच अनुषंगाने त्यांनी काँग्रेसमधील सध्याच्या गोंधळावर बोट ठेवले.
भाजपच्या राजकीय हालचालींबाबत बोलताना मुनगंटीवार यांनी दावा केला की, “आमच्या संपर्कात अनेक नगरसेवक आहेत. भाजपचा महापौर व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.” भाजप सत्तेत आल्यास शहराच्या विकासासाठी 24 योजना राबविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ईडीकडून क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “भुजबळांना ईडीने क्लीन चिट दिली आहे, याची मला माहिती नाही. माझा ईडीशी कोणताही परिचय नाही. जर क्लीन चिट दिली असेल तर ते चांगलेच आहे. ते त्यांचे नशीब आहे.”
एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच जोर आला असून, काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळाचा फायदा भाजप घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.