

Chandrapur Municipal Corporation Politics
चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, काँग्रेसमधील अंतर्गत वाद अखेर संपुष्टात आले आहेत. ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झालेल्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून संजीवनी वासेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, आरक्षणापूर्वी चर्चेत नसलेले हे नाव अचानक पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी महापौरपदावरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले होते. महापौरपद कुणाला द्यायचे, यावरून अनेक दिवस काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, अखेर वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याचे चित्र दिसत आहे.
महापौर पद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर पक्षातील चार महिला नगरसेविकांची नावे आघाडीवर होती. यात माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, वनश्री मेश्राम आणि संजीवनी वासेकर यांचा समावेश होता. या सर्वच महिला नगरसेविका अनुभवी आणि पक्षात आपापले वजन राखून असल्याने निर्णय घेणे काँग्रेस नेतृत्वासाठी आव्हानात्मक ठरत होते.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनाही मान्य होईल, असा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही नेत्यांना स्वीकारार्ह असलेले नाव म्हणून संजीवनी वासेकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १० एकोरी मधून विजयी झालेल्या संजीवनी वासेकर या नव्या चेहऱ्याला संधी देत काँग्रेसने सर्वांना धक्का दिला आहे. आरक्षणापूर्वी त्यांच्या नावाची कुठेही चर्चा नसताना, अचानक त्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आल्याने राजकीय चर्चांना वेगळेच वळण मिळाले आहे.
आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता असून, तसे झाल्यास काँग्रेसला अंतर्गत वादातून बाहेर काढणारी ही निवड ‘संजीवनी’ ठरेल, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. आता या निर्णयामुळे काँग्रेस स्थिर सत्तास्थापनेच्या दिशेने पावले टाकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.