

Wardha Hinganghat Police Action
हिंगणघाट : चंद्रपूर येथील सुधारगृहातून निघालेल्या सहा मुलींना हिंगणघाट पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले. पोलिसांच्या धाडसी आणि तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रपूर येथील एका सुधारगृहातील अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर सहा मुली निघून गेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांनी मुलींची शोधमोहीम सुरू केली. मुली रेल्वेने नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती वर्धा पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.
गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना मुली रेल्वे स्थानकजवळील परिसरात मिळाल्या. सहाही मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हिंगणघाट पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधला. रामनगर पोलिस ठाण्याचे पथक हिंगणघाट येथे दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलींना सुरक्षितपणे चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.