

Chandrapur Bal Nirikshan Gruha Warden Attacked
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील बालनिरीक्षणगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.१९) रात्री घडली. बालनिरीक्षणगृहातील वॉर्डनच्या गळ्याला धारदार काचेचा तुकडा लावून तिला धमकावत सहाही मुलींनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे बालनिरीक्षणगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून मुलींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मुली रेल्वेने प्रवास करत असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी वर्धा पोलिसांशी संपर्क साधून शोधमोहीम अधिक तीव्र केली.
दरम्यान, आरपीएफ आणि हिंगणघाट पोलिसांची मदत घेण्यात आली. संयुक्त शोधमोहिमेदरम्यान अखेर हिंगणघाट येथे सहाही मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांना चंद्रपूरला आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या घटनेने बालनिरीक्षणगृहातील सुरक्षा आणि तेथील अल्पवयीन मुलींच्या देखरेखीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वॉर्डनच्या गळ्याला काचेचा तुकडा लावण्यापर्यंत मुलींची मजल कशी गेली आणि सुरक्षेतील नेमक्या त्रुटी कोणत्या, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे