
चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होत असून सर्वच उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत लागले आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघातील आकापूर गावात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या वडिलांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी सभा घेतली. या सभेदरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांनी विद्युत अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदार संघ आहेत. त्यापैकी ब्रह्मपुरी हा एक मतदार संघ आहे. या मतदार संघाचे नेतृत्व सध्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार करत आहेत. या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी ब्रह्मपुरी विधानसभेची धुरा आपली कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार या रविवारी (दि.१०) रात्री ब्रह्मपुरी मतदार संघातील आकापुर गावात पोहोचल्या. यावेळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू असताना अचानक अचानक वीज पुरवठा खंडित झाला. सभा सुरू असतानाच गावात अंधार पसरल्याने शिवानी प्रचंड संतापल्या. याच संतापात त्यांनी वीज वितरण कंपनीला शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.