चंद्रपूर : जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी आपल्या पदासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही नेते जातीयवाद व अपमानास्पद वागणुक देत असल्यामुळे काम करणे शक्य होत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे ठेमस्कर यांचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून नम्रता ठेमस्कर अडीच वर्षापासून काम करीत आहेत. अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून मिळालेल्या सुचना, उपक्रम, आंदोलन, मेळावे प्रमाणिकपणे त्यांनी राबविले. परंतु जिल्ह्यातील पक्षाच्या काही नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षा मध्ये प्रचंड जातीयवाद निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वरोरा विधानसभेचा इच्छूक उमेदवार म्हणून अर्ज ठेमस्कर यांनी अर्ज भरला तेव्हापासून काही नेत्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री रमेश चैनिथला यांना लेखी तक्रारीद्वारे कळविले आहे. ऐवढेच नव्हे तर पदावर राहू नये त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला. विधान सभेचा फार्म भरल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याने त्यांनी या सर्व प्रकाराला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचेकडे दिला आहे. नम्रता ठेमस्कर यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात काँग्रेसमधील धुसफुस समोर आली आहे. राजीनामा स्विकारला जातो कि काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.