कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दि. ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या संविधान संमेलनाच्या निमित्ताने ते येत आहेत. या संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एक हजार लोकांना निमंत्रित केले आहे.
संविधान संमेलन दि. ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात होत आहे. यासाठी ठिकाण निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आतापर्यंत सुचविण्यात आलेल्या महासैनिक दरबार, धैर्यप्रसाद हॉल, हॉटेल सयाजीच्या मागील बाजूस असणारे लॉन या तीन ठिकाणांची पाहणी दिल्लीतून आलेल्या पथकाने केलेली आहे. याशिवाय आणखी दोन ठिकाणे सुचविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मंडप टाकून हे संमेलन घेण्याबाबतही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत ठिकाण निश्चित होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाचे वरिष्ठ पातळीवरून नियोजन सुरू आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरून सूचना येतील, त्यानुसार कार्यवाही करण्याची भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीची राहणार आहे.