

Online Cricket Betting on IPL Match in Gadchandur; Case Registered Against Two Individuals
चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर पोलीस स्टेशन हद्दीत IPL सामन्यावर ऑनलाईन क्रिकेट सट्टा लावणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, गडचांदुर पोलीस स्टेशन हद्दीत माशाअल्लाह बिर्याणी सेंटरसमोर काही इसम IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावत आहेत.
माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करत छापा टाकला असता, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या IPL सामन्यावर www.nice7777.fun या ऑनलाईन बेटिंग आयडीच्या माध्यमातून सट्टा खेळताना जुबेर रसुल सैयद (वय २२) रा. धुमने ले-आउट, गडचांदुर) याला ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान संशयित आरोपीकडून सुमारे २०,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तपासात पुढे उघड झाले की, या सट्ट्यासाठी बेटिंग आयडी पुरविण्याचे काम रोहीत काकडे (रा. गडचांदुर) हा करत होता. या प्रकरणी गडचांदुर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक २६१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, तसेच स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे आणि शेखर माथनकर आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.