

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात व धोकादायक गुंड आकाश उर्फ चिन्ना आनंद आंधेवार (वय ३७, रा. बामनी, ता. बल्लारपूर) याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावाला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मान्यता देत एक वर्षाकरिता त्यास मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.
सन २०१० पासून २०२५ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आकाश आंधेवार याच्याविरुद्ध तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खून, खंडणी, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत, अवैध दारू साठा, धमकावणे व शासन आदेशाचे उल्लंघन, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हल्ला करणे अशा गंभीर प्रकारांचा समावेश आहे. या कारवायांमुळे परिसरात आरोपीने दहशत निर्माण केली होती. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो कायद्याला जुमानत नसल्यामुळे पोलिसांनी कठोर कावारई करण्याचा निर्णय घेतला.
पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी आरोपीवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड व धोकादायक व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या अधिनियम १९८१ (सुधारित २००९, २०१५) अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दखल घेत १९ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश पारीत केला. त्यानुसार सोमवारी (दि.२१) आरोपीला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उप विभागाय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार (राजुरा), दिनकर ठोसरे (चिमुर), पो.नि. अमोल काचोरे (स्थागुशा), ठाणेदार पो. स्टे. बल्लारशा पो.नि. विपीन इंगळे, स.पो.नि. शब्बीर पठाण, पो.कॉ. मिलींद आत्राम यांच्यासह स्थागुशा पथकातील सपोनि दिपक कांक्रेडवार, योगेश खरसान, स.फौ. अरुण खारकर, पोहवा सुधिर मत्ते व परवरीश शेख आदींच्या पथकाने केली.