

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या प्रशिकचा मृतदेह घराबाहेर ठेवून नातेवाईकांसह गावकऱ्यांनी ठिय्या मांडला होता. अखेर संपूर्ण गावाला फेन्सिंग लावून हुडकी परिसरातील झुडपे साफ करू, व वाघाला जेरंबद करून इतर ठिकाणी हलवू , असे लेखी आश्वासन वनविभागाने दिल्यानंतर तब्बल ८ तासानंतर प्रशिकचा मृतदेह उचलण्यात आला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सिंदेवाही येथे शवचिच्छेदनासाठी पाठविला असून गावात गस्त वाढविली आहे.वनविभागाने मृत प्रशिकच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत केली असून त्यामध्ये २५ हजार रोख रक्कम व ९ लाख ७५ हजाराचा धनादेश दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सार्वजनिक गणपतीचा महाप्रसाद खाऊन काका नंदू मानकर हे आठ वर्षाचा पुतण्या प्रशिक व सहा वर्षाच्या पुतणीला घेऊन घरी येत होते. त्याचवेळी अंगणाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या वाघाने काकाच्या डाव्या हातातूनच प्रशिकला उचलून फरफटत नेले. ही घटना गुरूवारी (दि.१८) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. यानंतर पोलिस,वनविभाग व गावकऱ्यांनी गुरूवारी रात्री परिसर पालथा घातला. अखेर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रशकचा मृतदेह हुडकी परिसरात आढळून आला.
या घटनेमुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह घरी आणत घरासमोर मृतदेहासह ठिय्या मांडला व वनविभाग बिबट वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप करून पोलिस व वनाधिकाऱ्यांना मृतदेह उचलण्यास नकार दिला. वनविभागाच्या निष्क्रीय कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करीत गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. जो पर्यंत गावातील नागरिकांची वन्यप्राण्यांपासून सुरक्षितता होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तब्बल आठ तास गावकऱ्यांची व कुटुंबियांची वनविभागाने मनधरणी केली. तत्पूर्वी गावकऱ्यांनी काही मागण्या पुढे ठेवल्या. त्याकरीता गावातील बौध्द विहार परिसरात दुपारी गावकरी एकत्र झाले. त्या ठिकाणी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. त्यांनी येऊन गावकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यावर चर्चा झाली. गावकऱ्यांनी, गडबोरी परिसरातील वाघ,बिबट्या अशा हिस्र प्राण्यांना तातडीने जेरबंद करून अन्यत्र हलविण्यात यावे, गावाला संपूर्ण फेन्सींग करण्यात यावी, हुडकी परिसरात झुडपी जंगल वाढल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते जंगल साफ करण्यात यावे, अशा मागण्या उचलून धरल्या.
वनविभागाने या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी प्रशकचा मृतदेह उचलण्यास परवानगी दिली. त्यानंतर तब्बल आठ तासांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी सिंदेवाही येथे शवविच्दछेदनासाठी पाठविला. वनविभागाने गावात गस्त वाढविली असून वाघाच्या शोधासाठी ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले आहे.