NEET पेपरफुटी प्रकरण : सीबीआयच्या पथकांनी गोपनीयता पाळत ब्रह्मपुरीतील विद्यार्थ्याच्या घरावर छापा

लातूरच्या कोचिंग क्लास संचालकाच्या अटकेनंतर तपासाची व्याप्ती वाढली; मोबाईल व कागदपत्रांची झाडाझडती
NEET UG Result 2025 |
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

CBI raid Bramhapuri

चंद्रपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता विदर्भापर्यंत पोहोचले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवली आहे. काल सकाळी सीबीआयच्या दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी  चंद्रपूर जिल्ह्यात अत्यंत गोपनीय पद्धतीने धडक कारवाई केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात एका संशयित विद्यार्थ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील नामांकित कोचिंग क्लासचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर सीबीआयच्या हाती काही महत्त्वपूर्ण माहिती लागली होती. त्या आधारेच विदर्भातील काही विद्यार्थ्यांपर्यंत तपासाची साखळी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. ब्रह्मपुरीतील ज्या विद्यार्थ्याच्या घरी सीबीआयने छापा टाकला, तो विद्यार्थी नांदेड येथील मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

NEET UG Result 2025 |
NEET Paper Leak : मोटेगावकरांमुळे काही शिकवणी संस्थांचे ‌‘अर्थ-रसायन‌’ लयास!

तपासादरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्याची सखोल चौकशी केली. त्याच्याकडील मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा पूर्वी प्रश्नपत्रिका अथवा त्यासंबंधित माहिती पुरविण्यात आली होती का, याबाबत तपास यंत्रणा बारकाईने चौकशी करत आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईदरम्यान स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. सीबीआयच्या पथकांनी अत्यंत गोपनीयता पाळत थेट संशयितांच्या घरांवर धाड टाकली.

NEET UG Result 2025 |
NEET Paper Leak Case: शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसवर पुणे महापालिकेची मोठी कारवाई; JM रोडवरील कॅम्पस सील

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार, दलाल आणि कोचिंग नेटवर्क यांच्यातील संबंध उघड करण्यासाठी सीबीआयने तपासाची गती वाढवली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका कशा पोहोचल्या, आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले आणि यामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत होते, याचा शोध घेतला जात आहे.

सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी काही ठिकाणी छापेमारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news