

ताडोबा-अंधारीसह विविध व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश चंद्रपुरात लावण्यात आलेल्या “व्याघ्र संवर्धनासाठी संकल्प संवर्धन प्रदर्शनी मधून दिल्या जात आहे. प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेले वाघांचे बोलके छायाचित्रे हे ताडोबा क्षेत्राचे छायाचित्रकार, वन्यजी व निसर्गप्रेमी यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधूनच काढले आहे. शुक्रवारी (दि. १६) अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान, विसापूर (चंद्रपूर) येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर (भावसे) यांच्या हस्ते व्याघ्र संवर्धन व संरक्षण प्रदर्शनीचे उद्घाटन पार पडले. सदर प्रदर्शनामधील छायाचित्र विक्रीकरिता सुद्धा उपलब्ध आहेत.
वाघाचे बोलके, आनंददायी, रोमांचकारिक तसेच संवेदनशीलता असलेले कलात्मक छायाचित्र ज्यांच्या निसर्गाशी अनुरूप असलेला सहसंबंध अशा वैविध्यपूर्ण संकल्पनेतून व्याघ्र संवर्धनाचा उद्देश या प्रदर्शनीतून यशस्वी केला जाणार आहे. या प्रदर्शनीतील सर्व छायाचित्र हे ताडोबा क्षेत्रातील असून विविध छायाचित्रकार, वन्यजीव व निसर्गप्रेमी यांनी काढले आहेत. वाघाच्या संवर्धनाची चळवळ व्यापक व्हावी, वाघाचे निसर्गातील महत्व समाजातील सर्वस्तरातील समुदयाला कळावे या उद्देशाने चंद्रपूरच्या येथील प्रदर्शनी नंतर हा नाविण्यपूर्ण उपक्रम मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे.
चंद्रपूरात 16 ऑगस्ट पासून “व्याघ्र संवर्धनासाठी संकल्प संवर्धन प्रदर्शनी भरविण्यात आलेली आहे. या प्रदर्शनीमधून वाघांच्या संवर्धन व संरक्षणाचा संदेश सर्वदूर पोहचविल्या जात आहे. या उपक्रमाचे वने, मत्य्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जगभर पोहचणार आहे. या उपक्रमासाठी वनविभागाचे सर्व अधिकारी, कमर्चारी तसेच निसर्ग प्रेमी परिश्रम घेत आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो, असा संदेश दिला आहे.
“व्याघ्र संवर्धनासाठी संकल्प संवर्धन” प्रदर्शनी ही कला व निसर्ग यांच्या अंतरंगातील आशय व स्नेहाचे प्रतीक आहे. जगभरातील लोकांनी निसर्ग संवर्धनासाठी एकत्रित येण्याची संकल्पना या प्रदर्शनतीमधून मांडण्यात आली आहे. वाघ व वाघाच्या अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, आर्थिक व सामाजिक पाठबळ उभे करून मौल्यवान वन्यजीवांचे आणि नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याचा मानस असल्याचे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला.