नागपूर : पुढारी वृत्तसेवा
विदर्भातील नागपूर जिल्ह्यात असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात दोन वर्ष वयाचा एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेचा अधिक तपास वनपाल राजीव मेश्राम आणि वनरक्षक महेश गायकवाड करीत आहेत.
वाचा : नागपुरात २४ वर्षीय जवानाची आत्महत्या; पाच महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील पूर्व कुटुंबा नियत क्षेत्रात (कक्ष क्रमांक ५१५ मध्ये) साधारण २ वर्षे वयाचा मादी जातीचा मृत बिबट्या आढळून आला. वनविभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे जंगल गस्ती घालत असताना वनरक्षक आणि वन कर्मचाऱ्यांना गुरूवारी (दि २९) रोजी ही बाब निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेन्दू पाठक, सहायक वनसंरक्षक किरण पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वनअधिकाऱ्यांना हा मृत बिबट्या साधारण दोन वर्षे वयाचा असून त्याच्या शरीरावर झटापटीच्या खुणा दिसत असल्याचे सांगितले.
वाचा : पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन
यावरून दुसऱ्या एका हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात या बिबट्याचा मूत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. या घटनेपासून एक हजार मीटरच्या परिघात अन्य प्राण्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अस्तित्वाचा तपास वनकर्मचारी करत आहेत. दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (SOP) सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येऊन रीतसर दहन करण्यात आले. या घटनेबाबत अधिक तपास वनपाल राजीव मेश्राम आणि वनरक्षक महेश गायकवाड करीत आहेत.