Chandrapur Highway Cleaning | राज्यातील पहिलाच प्रयोग: चंद्रपुरात राष्ट्रीय महामार्गाच्या सफाईसाठी ‘मेकॅनाइज्ड रोड स्वीपर’चा वापर

; सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर भर
 National Highway   Sweeping Machine
National Highway Sweeping MachinePudhari
Published on: 
Updated on: 

Chandrapur National Highway Sweeping Machine

चंद्रपूर: महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा–गोविंदपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी वर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महामार्ग स्वच्छतेचा नवा प्रयोग राबविण्यात येत आहे. महामार्गावरील धूळ, माती आणि कचरा हटविण्यासाठी ‘मेकॅनाइज्ड रोड स्वीपर’ या यंत्राचा वापर केला जात असून, हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती  आहे. यामुळे महामार्गाच्या नियमित स्वच्छतेला गती मिळण्यासोबतच सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत आहे.

राजुरा ते गोविंदपूरदरम्यानचा हा चारपदरी महामार्ग केवळ दोन राज्यांना जोडणारा दळणवळणाचा मार्ग नसून, आधुनिक रस्ते बांधणी, वाहतूक सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनाच्या विविध सुविधांमुळेही लक्षवेधी ठरत आहे. महामार्गाच्या देखभालीसाठी यांत्रिक सफाई यंत्राचा वापर हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या सफाईच्या तुलनेत यंत्राच्या साहाय्याने मोठ्या परिसराची सफाई अधिक वेगाने करता येऊ शकते. त्यामुळे रस्त्यावर साचणारी धूळ आणि कचरा हटविण्यास मदत होत आहे.

 National Highway   Sweeping Machine
Chandrapur news: आजारी असूनही वडिलांनी घरी नेले नाही; सैनिकी शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

५६ किलोमीटरचा चारपदरी महामार्ग

या महामार्गाची लांबी ५६.१८० किलोमीटर असून, त्यामध्ये एक मोठा पूल, २८ छोटे पूल, ६६ कल्व्हर्ट आणि तीन वाहन भुयारी मार्गांचा समावेश आहे. वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा, यासाठी स्पष्ट रोड मार्किंग, दिशादर्शक फलक, क्रॅश बॅरिअर, रेट्रो रिफ्लेक्टर आणि पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नॉईज बॅरिअर, वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग, बसथांबे आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधांचाही समावेश आहे.

टोल प्लाझाजवळ रेस्टॉरंट आणि कॅफेची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विश्रांती आणि आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होते.

 National Highway   Sweeping Machine
Chandrapur News| बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना

महामार्गाचा काही भाग वनक्षेत्रातून जात असल्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात एलिव्हेटेड रोड, वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग आणि वन्यजीव क्षेत्र दर्शविणारे सूचना फलक उभारण्यात आले आहेत. या उपायांमुळे वन्यप्राण्यांचा वाहनांशी होणारा संभाव्य संघर्ष कमी करण्यास मदत होऊ शकते.

महामार्गाच्या मध्यभागी वृक्षारोपण करण्यात आले असून, रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाचा थेट त्रास कमी करण्यासही त्याचा उपयोग होतो. वृक्षसंवर्धनासाठी दर दहा किलोमीटरवर बोअरवेलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. महामार्ग निर्मितीदरम्यान नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, पावसाचे पाणी साठविण्यासाठी १२० ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात येत आहे. महामार्गाच्या निर्मितीदरम्यान ५५ हजारांहून अधिक वृक्षांचे रोपण किंवा पुनर्लागवड करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांना तातडीची मदत

महामार्गावरील अपघातांच्या प्रसंगी तातडीने मदत मिळावी, यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा ठेवण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर साधारण १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते. आपत्कालीन मदतीसाठी १०३३ हा हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध आहे. याशिवाय महामार्गावर नियमित गस्त घालण्यात येते.

प्रवासादरम्यान वाहन बंद पडणे, इंधन संपणे किंवा अन्य तांत्रिक अडचणी निर्माण होणे अशा परिस्थितीतही मदत मिळावी, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर मेटल बीम क्रॅश बॅरिअर बसविण्यात आले असून, वाहन अनियंत्रित झाल्यास गंभीर अपघाताचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरते.

 National Highway   Sweeping Machine
Dog Loyalty in Chandrapur | अपघातानंतर मालक रुग्णालयात तर जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा : मुक्या प्राण्याच्या निष्ठेने जिंकली मने!

दोन राज्यांतील प्रवासाला गती; उद्योगांनाही चालना

या महामार्गामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांदरम्यानचा प्रवास अधिक सुकर झाला आहे. प्रवासातील वेळ आणि अंतर वाचण्यास मदत होत असून, मालवाहतुकीलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. महामार्गाच्या परिसरात उद्योग, वेअरहाऊस, पेट्रोल पंप आणि लॉजिस्टिक हब यांसारख्या व्यवसायांच्या उभारणीला चालना मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news