

चंद्रपूर : बल्लारपूरवरून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या धडकेत एक नर बिबट गंभीर जखमी झाला. ही घटना काल बुधवारी पहाटे साडेचारच्या वाजता चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल उपक्षेत्र, नियतक्षेत्र चिरोली येथील कक्ष क्रमांक ७१८ जवळील बल्लारपूर–गोंदिया रेल्वे मार्गावर घडली.
सुमारे एक वर्ष वयाचा हा नर बिबट पटरीजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याचा उजव्या पायाचा पंजा रेल्वे धडकेत तुटला होता. गस्त घालत असताना वनकर्मचाऱ्यांना पोल क्रमांक १२०६ जवळ ही घटना निदर्शनास आली. शोधाशोध केली असता पटरीलगत असलेल्या झुडपात बिबट वेदनांनी कळवळत बसलेला आढळला.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच, वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पकडण्यात पथकाला यश आले.
जखमी बिबट्याला तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील टीटीसी (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर) येथे हलविण्यात आले. त्याच्या प्रकृतीवर तज्ज्ञांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
या मोहिमेत चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी राजन तलमले, सहायक वनसंरक्षक व्ही. एस. तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती व्ही. महेशकर, क्षेत्र सहायक मनीष आर. नीमकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोडचेलवार, टीटीसी चंद्रपूर पथक, आर. आर. यू. टीम व वन कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे मार्गांवरून जाणाऱ्या वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे.