चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील तिरवंजा येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना रविवारी (दि.२९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.आनंदराव मारोती ढवस (वय ६७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भद्रावती तालुक्यातील तिरवंजा गावचे रहिवासी आनंदराव ढवस हे रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या शेतातील कामे आटपून घरी परत येत होते. यावेळी भटाळी येथील वेकोलीच्या डम्पिंग परिसरात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर, दोन्ही डोळ्यांवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डम्पिंग परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी लवकरात लवकर या अस्वलाला पकडून जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.