

कणकवली : सिंधुदुर्गातील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक हे धबधब्यांवर घसरून पडत जखमी होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. कणकवली तालुक्यातील धबधब्यांवर घसरून तीन पर्यटक जखमी होवून ते उपचारासाठी रविवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. धबधब्यांवर पाणी, खडक, दगड व त्यावरील शेवाळ याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पडत हे पर्यटक किरकोळरित्या जखमी झाले होते. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना आपल्या जीवाची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे याचेही भान वर्षा पर्यटकांनी राखायला हवे.
सिंधुदुर्गाच्या विविध भागातील धबधब्यांवर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील व बाहेरच्या जिल्हयातील अनेक पर्यटक येत असतात. रविवारी सुट्टी असल्याने आंबोलीसह जिल्ह्यातील अनेक धबधब्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वर्षा पर्यटनामध्ये अनेक हौशी पर्यटक हे मद्याचाही आनंद घेत असतात. त्यामुळे अनेक वेळा काही पर्यटक अतिउत्साही होत मौजमस्ती धबधबे व परिसरातील ओहोळांमध्ये करत असतात.
मात्र तेथील नैसर्गिक परिस्थिती दगड, खडक यांचा अंदाज पर्यटकांना नसल्याने घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. हा धोका पत्करून अनेक पर्यटक आनंद घेत असतात. असाच आनंद घेताना रविवारी वेगवेगळ्या धबधब्यांच्या परिसरात काही पर्यटक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना रुग्णालयात आणून उपचारही करण्यात आले होते. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःबरोबरच सोबतच्या मंडळींची काळजी घेणे आवश्यक आहे.