

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांची गुरुवारी (दि.२२) सायंकाळी चंद्रपुरात बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर ठाकरे निघून गेले. त्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्राकरिता घोषित करण्यात आलेल्या उमेदवारीवरून मनसेच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. गुरूवारी ते चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक नागपूर मार्गांवरील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास बैठक सुरू झाली. जिल्हयातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरेंनी बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधल्यानंतर दोन विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा केली.
चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक दिवसांपासून काम करीत असलेले चंद्रप्रकाश बोरकर यांना राजुरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी घोषित न केल्यामुळे त्यांनी नाराजी दर्शविली. यावेळी त्यांनी भोयर यांना उमेदवारी देण्यावर आक्षेप घेतला. बैठक पार पडल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे परत निघाले. त्यानंतर हॉटेलमध्ये सचिन भोयर आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी नारेबाजीला सुरुवात केली. दोन्ही गटात वाद वाढल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.