

चंद्रपूर : भारतातील सर्वात प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे या संस्थेत चंद्रपूर जिल्ह्याचा तरुण साहिल संजय घोनमोडेची निवड झाली आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा गावचा हा तरुण अभिनय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, त्याच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.
एफटीआयआय ही भारतातील चित्रपट आणि टेलिव्हीजन अभिनयाच्या शिक्षणासाठी सर्वाधिक मानाची संस्था मानली जाते. याच संस्थेतून शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, राजकुमार राव यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले असून, भारतीय चित्रपटसृष्टीत आपले तेजस्वी स्थान निर्माण केले आहे.
या वर्षी देशभरातून तब्बल १०,००० विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या प्रवेश परीक्षेसाठी प्रयत्न केले. त्यापैकी केवळ १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या दोन भाग्यवानांपैकी एक म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा साहिल संजय घोनमोडे!
साहिल याला अभिनयाची आवड लहानपणापासूनच असलेल्या साहिलने शालेय जीवनात ‘अहंकार’ या नाटकात बालकलाकार म्हणून चमक दाखवली. त्यानंतर ‘द सेंट’ या इंग्रजी नाटकातही प्रभावी अभिनय सादर करत त्याने रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केली.
मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच साहिलने एफटीआयआयची प्रवेश परीक्षा दिली आणि मेहनत, जिद्द, व अभिनय कौशल्याच्या जोरावर या कठीण स्पर्धेत यश संपादन केले. एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळवणे हे कोणत्याही कलाकारासाठी मोठ्या सन्मानाचे मानले जाते. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक कलाकार आज बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावत आहेत.
साहिलच्या या निवडीमुळे केवळ त्याच्या कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक, कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन होत असून, “साहिल घोनमोडे लवकरच चांदण्यांच्या दुनियेत चंद्रपूरचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.